रविवार उमेदवारांच्या आवडीचा; प्रचार आज शिगेला पोहोचणार

Foto
छत्रपती संभाजीनगर : (सांजवार्ता ब्युरो) : महापालिका निवडणूक प्रचारासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आजचा सुटीचा रविवार उमेदवारांचा टॉप फेवरेट आहे. आज शहरात प्रचार रॅली, आणि सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवार जीवाचे रान करीत आहेत. शहरात बाईक रॅली, पदयात्रा, नेत्यांच्या सभेबरोबरच रोड शो, रात्रीच्या कॉर्नर सभांचा धडाका उडणार आहे. प्रचारासाठी दोनच दिवस राहिल्याने उमेदवारांची धावपळ सुरू आहे. त्याचबरोबर शहरात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाकाही उडणार आहे. आजचा रविवार भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांनी गाजणार आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. सुट्टीच्या निमित्ताने घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत.
 
शिंदे करणार पलटवार...

काल उद्धव ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर पार पडली. या सभेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. उद्धव ठाकरेंनी पाणी प्रश्नावर भाजप आणि शिंदे सेनेला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम करून शहरात आग लावणार्‍यांनी विझवायला पाणीही नाही, याची जाण ठेवण्याचे आवाहन केले. आता उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. शिंदे काय उत्तर देतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

टीव्ही सेंटरला शिंदेची सभा...

सिडको हडको परिसरातील टिव्ही सेंटर येथे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. या सभेला पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी शिंदे सेनेने केली आहे. या सभेकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.